*प्रेमाची परिभाषा मांडणारं 'तुझा झालो गं' गाणं घेतंय प्रेक्षकांच्या मनाचा ठाव*
*सूर्या तोरसे आणि अश्विनी चवरेची जोडी थिरकायला भाग पाडणार 'तुझा झालो गं' या प्रेमगीतातून*
'मितवा' म्हणजेच 'मित्र', 'तत्वज्ञानी' आणि 'वाटाड्या'. या मितवा शब्दाची व्याख्याच निराळी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी असा मितवा असतो जो वेळोवेळी आपल्याला मदतीचा हात पुढे करतो इतकंच नव्हे तर नकळतपणे ही तो बरीचशी मदत आपल्याला करताना दिसतो. मात्र एका उंचीवर गेल्यानंतर त्या मित्राला विसरायचं नसतं याचं भान प्रत्येकाला असणंही तितकंच आवश्यक आहे. बरेचदा या मैत्रीचं रुपांतर प्रेमातही होताना पाहायला मिळतं. मैत्रीची व्याख्या ही निराळी असली तरी त्याला प्रेमाचे बंध आले की, ते नातं एका वेगळ्याच दिशेने उलगडताना दिसतं. अशाच मैत्रीची, प्रेमाची अशी अनोखी अशी रंजक कथा एका नव्या कोऱ्या 'झालो तुझा गं' या गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.
रोमँटिक गाण्यांची सध्या चलती असताना एका आशयघन कथेला अनुसरून हे प्रेम गीत साऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतंय. मनाला भिडणारी अशी अप्रतिम प्रेमकथा या गाण्यातून प्रत्येक प्रेमी युगुलाचा भाग होण्यास सज्ज होत आहे. 'सूर्याशक्ती प्रॉडक्शन' प्रस्तुत 'तुझा झालो गं' या गाण्यातून मैत्री व प्रेमाचा रोमांचक असा प्रवास उलगडताना पाहायला मिळत आहे. तर या गाण्यातून अभिनेता सूर्या तोरसे आणि अभिनेत्री अश्विनी चवरे ही कलाकार जोडी साऱ्यांच्या मनाचा ठाव घेणार आहे. तर या रोमँटिक सॉंगला गायिका सोनाली सोनावणे आणि गायक रवींद्र खोमणे यांनी सुरबद्ध केलं आहे.
'तुझा झालो गं' या गाण्याची निर्मिती निर्माते संतोष पवार व रुतु कदम यांनी केली असून या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा नॉडी रसाळ याने उत्तमरीत्या पेलवली आहे. गाण्याचे बोल दिप्तेश कासारे याने शब्दबद्ध केले असून संगीताची संपूर्ण जबाबदारी दिप्तेश कासारे आणि सुनील म्हात्रे यांनी सांभाळली आहे. आशयघन कथा असलेलं हे प्रेमगीत साऱ्यांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे.