Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रेमात पुरुषांना हवे प्रेम आणि रोमान्स तर महिलांना सुसंगतता: जीवनसाथी

 प्रेमात पुरुषांना हवे प्रेम आणि रोमान्स तर महिलांना सुसंगतता: जीवनसाथी

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२५: जीवनसाथीचा २१००० पेक्षा जास्त प्रतिसादकांच्या विचारांवर आधारित ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’ भारतीय अविवाहितांमधील नात्यांसंबंधी बदलत्या प्राथमिकतांवर प्रकाश टाकतो. या निरीक्षणांमधून सूचित होते की, पुरुष प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देतात, तर महिला विशेष करून सुसंगततेला (कम्पॅटिबिलिटी) महत्त्व देतात. विवाह, आर्थिक स्थैर्य आणि जोडीदाराची निवड करण्यात माता-पित्याचा प्रभाव याबाबतीती बदलत चाललेल्या वृत्तीवर देखील हा अहवाल प्रकाश टाकतो.  


या सर्वेक्षणानुसार २९% महिलांच्या तुलनेत ४७% पुरुष जोडीदाराची निवड करताना प्रेम आणि रोमान्सला प्राधान्य देतात. तर ३९% महिला सुसंगततेला अग्रक्रम देतात. केवळ ११% अविवाहित असे आहेत, जे जोडीदाराची निवड करताना आर्थिक स्थैर्य हा सर्वात महत्वाचा घटक मानतात. प्रादेशिक भेद देखील दिसून आला आहे. दिल्ली आणि मुंबईतील अविवाहितांच्या लेखी रोमान्सला महत्त्व आहे, तर बंगळूरमधील अविवाहित सुसंगततेवर भर देतात.


या अहवालात असेही आढळून आले की, ४०% अविवाहित योग्य जोडीदार मिळाल्यास परदेशी जायला तयार आहेत. हा पारंपरिक अपेक्षांमधील मोठा बदल आहे. परंतु, ७०% पालक मात्र अशी अपेक्षा करत आहेत की, आपल्या मुलांनी लग्न करून भारतातच राहावे किंवा भारतात परतावे. शहरानुसार या विचारसरणीत बदल होत असल्याचे दिसते. मुंबई, पुणे आणि बंगळूरमधील प्रतिसादकांनी एनआरआय जोडीदाराशी विवाहबद्ध होण्याची तयारी अधिक दर्शविली आहे. तर, दिल्लीतील अविवाहित मात्र भारतातच स्थायिक होण्याबाबत आग्रही दिसतात.




जीवनसाथीचे चीफ बिझनेस ऑफिसर रोहन माथुर म्हणाले, “भारतीय अविवाहित नातेसंबंधाच्या नियमांना नव्याने आकार देत आहेत. सुसंगततेला आणि व्यक्तिगत आवडी-निवडीला पारंपरिक अपेक्षांपेक्षा जास्त प्राधान्य देत आहेत. जीवनसाथीच्या ‘मॉडर्न मॅचमेकिंग रिपोर्ट २०२५’ मध्ये ही बदलती विचारसरणी स्पष्ट दिसून येते. यामध्ये प्रेमाचे वाढते प्राधान्य दिसते. म्हणजेच सामाजिक दबावापेक्षा व्यक्तिगत मूल्यांशी निगडित प्रेमाला वाढती प्राथमिकता देण्यावर भर दिसून येतो. एक विश्वसनीय मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म म्हणून अर्थपूर्ण नाती जोडण्यासाठी आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत करण्यासाठी अविवाहितांना सक्षम करण्याबाबत आम्ही वचनबद्ध आहोत.”

वय वर्ष २७च्या खालील अविवाहितांच्या मते, २७-३० हे विवाहबद्ध होण्यासाठीचे आदर्श वय आहे. परंतु वयाने मोठे असलेले प्रतिसादक आणि अनेक माता-पिता यांच्या मते मात्र योग्य जोडीदार मिळाल्यावर विवाह केला पाहिजे. हा विवाह-योग्य वयाच्या बाबतीतील एक अधिक लवचिक दृष्टिकोन आहे. लग्नावर होणाऱ्या खर्चात समान आर्थिक विभागणीची अपेक्षा या सर्वेक्षणातून व्यक्त झाली आहे. सुमारे ७२% अविवाहित मानतात की, खर्च दोन्ही जोडीदारांमध्ये वाटला गेला पाहिजे. फक्त १७% अविवाहितांना असे वाटते की, ज्यांना थाटामाटात लग्न करायची इच्छा असेल, त्यांनी स्वतःच हा खर्च केला पाहिजे. विचारातील हा बदल पालकांना देखील मान्य आहे. एका बाजूच्याच पक्षावर आर्थिक बोजा येण्याच्या पारंपरिक पद्धतीपासून दूर जाण्याचा संकेत यातून मिळतो.

माता-पिता आता मुख्यतः विश्वसनीय सल्लागार बनले आहेत आणि निर्णय घेण्याचा अधिकार मोठ्या प्रमाणात स्वतः उपवर मुला-मुलीकडे आहे. फक्त ४% प्रतिसादकांनी सांगितले की, त्यांचे आई-वडील त्यांच्या पसंतीचा जीवनसाथी निवडतील. यावरून विवाह विषयक निर्णय घेण्यातील स्वायत्ततेचे वाढते प्रमाण दिसून येते. जोडी जुळवताना ज्योतिष शास्त्रासंबंधी दृष्टिकोन सतत बदलत आहे. दिल्लीतील प्रत्येक तीन पैकी एक प्रतिसादक असे मानतो की कुंडली जुळवणे महत्त्वाचे आहे. मात्र मुंबईतील अविवाहित कुंडली जुळवण्यापेक्षा व्यक्तिगत सुसंगततेला प्राधान्य देताना दिसतात.

आधुनिक नात्यांत संतुलन आणि व्यक्तिगत ध्येये आणि मूल्ये यांची कास न सोडता प्रेम शोधण्याचा प्रयत्न केला जातो. या प्राथमिकता बदलत आहेत. अशा वेळी ‘जीवनसाथी’ उपवर मुला-मुलींना त्यांच्या अनोख्या प्रवासाशी जुळवून घेणारी अर्थपूर्ण नाती शोधण्यासाठी त्यांना मदत करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.