Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*कोकणाच्या विकासासाठी सर्व पक्षांचा पुढाकार आवश्यक – उदय सामंत*

 *कोकणाच्या विकासासाठी सर्व पक्षांचा पुढाकार आवश्यक – उदय सामंत*



*ग्लोबल कोकण महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद – हापूस आंब्याच्या होलसेल मार्केटला व्यापाऱ्यांकडून मोठी मागणी! शेवटचे दोन दिवस शिल्लक!*


*मुंबई, ७ मार्च २०२५ :* कोकणाची शोभा, संस्कृती आणि समृद्ध वारसा ग्लोबल कोकण फेस्टिवल या छताखाली पाहायला मिळेल. इथे आलात की, सह्याद्रीच्या डोंगररांगा, निसर्गाच्या कुशीतली पर्यटन स्थळं, गजबजलेले समुद्रकिनारे आणि हिरवाईची चादर पांघरलेली जंगलं तुमच्यासमोर उभी राहतात.



*ग्लोबल कोकण चे अध्यक्ष्य व उद्योग मंत्री मा. श्री. उदय सामंत म्हणाले* ''यांसारख्या कार्यक्रमांमुळे कोकणवासीय परत कोकणात येण्यासाठी प्रोत्साहित होतील, कोकणातील लोकांनी सुरू केलेल्या व्यवसायांकडे पाहता, कोकण हा प्रगतीच्या शर्यतीत मागे राहणार नाही, कोकणाच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन पुढाकार घेण्याची गरज आहे. मला अभिमानाने सांगायचे आहे की कोकण हा कॅलिफोर्नियापेक्षा अधिक समृद्ध आणि प्रगत आहे.रत्नागिरी येथे संरक्षण क्लस्टर विकसित होत आहे, जिथे ६५०० युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, आगामी सेमीकंडक्टर प्रकल्पामुळे २०,००० युवकांना रोजगार मिळणार आहे. पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त उद्योग तसेच कारखान्यांचे स्वागत केले पाहिजे, जे कोकणातील रोजगाराच्या संधी वाढवू शकतात''.



शाश्वत पर्यटनाचं महत्त्व अधोरेखित करणारी विशेष गॅलरी इथे पाहायला मिळतेय. बोरिवली नॅशनल पार्क, ठाणे मंग्रोव्ह आणि सह्याद्री पर्वतरांगांमधल्या जैवविविधतेची झलक या दालनात मांडली आहे.


या महोत्सवात कोकणच्या लोककलेलाही विशेष स्थान दिलं आहे. कोळी नृत्य, तारपा नृत्य, जाखडी, गौरी नृत्य आणि दशावतार नाट्यप्रकार सादर केले जात आहेत. याशिवाय, आधुनिक मराठी संगीताला ग्लोबल स्टेजवर स्थान देण्यासाठी हिप-हॉप, रॅप आणि बीटबॉक्सिंगसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


महिला बचत गटांनी तयार केलेल्या स्थानिक हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ आणि विविध उत्पादनं इथे विक्रीसाठी ठेवली आहेत. कोकणच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी मालवणी, आगरी आणि संगमेश्वरी पदार्थांची खास दालनं आहेत.



कोकण भूमी प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. संजय यादवराव म्हणाले, "या वर्षी ग्लोबल कोकणला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोकणची समृद्ध संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि पर्यटन स्थळांचा जागतिक स्तरावर प्रचार हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळावं, कोकणात तयार होणाऱ्या खास उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावीत आणि कोकणच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी हा महोत्सव दरवर्षी अधिक भव्य स्वरूपात आयोजित केला जातो' तसेच हापूस आंब्याचे होलसेल मार्केट कोकणात सुरू करणार ! थेट शेतकरी ते देशभरातल्या व्यापारी ही संकल्पना ग्लोबल कोकण राबवणार."


ग्लोबल कोकण महोत्सवात गुंतवणूकदारांसाठी विशेष दालनं उभारण्यात आली आहेत. जेएसडब्ल्यू जिंदाल पोर्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, एमएसआरडीसी आणि सिडको यांनी कोकणातील नव्या पायाभूत सुविधांची माहिती इथे मांडली आहे.


६ ते ९ मार्च दरम्यान नेस्को कॉम्प्लेक्स, गोरेगाव येथे सुरू असलेल्या या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. कोकणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कोकणाचा हा सांस्कृतिक आणि व्यावसायिक सोहळा अनुभवावा.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.