*'झी २४ तास मराठी सन्मान २०२५' पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती*
मुंबई , ८ ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्रातील आघाडीची मराठी वृत्तवाहिनी 'झी २४ तास'चा 'मराठी सन्मान पुरस्कार सोहळा २०२५' हा मुंबईतील सहारा स्टार हॉटेल येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या भव्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टी आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि दिग्गज कलाकार उपस्थित होते. यात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, दिग्दर्शक महेश मांजरेकर, सुपरस्टार भरत जाधव, श्रेयस तळपदे, अभिनेत्री प्राजक्ता माळी, वैदेही परशुरामी आणि उर्मिला कानिटकर यांचा समावेश होता. सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता अभिजीत खांडकेकर आणि 'झी २४ तास'च्या अँकर अनुपमा खानविलकर यांनी सांभाळली.
अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीने अवतरलेल्या या पुरस्कार सोहळ्यात आकर्षक सादरीकरणे, नृत्याविष्कार आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांनी साज चढवला होता. नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील आणि वैदेही परशुरामी यांचे नृत्याविष्कार लक्ष्यवेधी ठरले. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले, तर महेश मांजरेकर यांना 'मराठी मातीचा मानबिंदू' पुरस्कार बहाल करण्यात आला. हे पुरस्कार महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाचे प्रतीक ठरले. चित्रपट, नाटक, संगीत आणि सामाजिक कार्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना यावेळी गौरवण्यात आले. हे सर्व विजेते महाराष्ट्राच्या सर्जनशीलतेचा, जिद्दीचा आणि प्रगत विचारसरणीचा गौरव आहेत.
फक्त लढ म्हणा
झी २४ तासने ‘फक्त लढ म्हणा’ ही हृदयस्पर्शी मोहीम सुरू केली आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक हात मदतीचा हा या मोहिमेचा उद्देश आहे. या दीर्घकालीन मोहिमेअंतर्गत, झी २४ तासने पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा उपक्रम राबवला आहे. अनेक सेलिब्रिटींनी या उपक्रमासाठी हातभार लावण्याचे आश्वासन दिले असून, काहींनी दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रायोजित करण्याची जबाबदारी घेतली आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी दोन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली.
*मुख्यमंत्र्याकडून झी २४ तासचे कौतुक*
या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस सांगितले की, “या प्रतिष्ठित पुरस्कार समारंभाचा भाग होण्याचा मला अभिमान वाटतो. महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना 'जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्याचा सन्मान मला मिळाला, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. तसेच भरत जाधव आणि इतर अनेक कलावंतांचा गौरव होताना पाहणे आनंददायी आहे. झी २४ तासच्या ‘फक्त लढ म्हणा’ या उपक्रमाबद्दल आणि कमलेश सुतार यांच्या प्रयत्नांबद्दल मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. समाजाच्या उभारणीसाठी असे उपक्रम अत्यंत आवश्यक आहेत आणि प्रत्येकाने यात योगदान द्यावे, असे मी सर्वांना आवाहन करतो.”
'झी २४ तास मराठी सन्मान २०२५' हा पुरस्कार सोहळा लवकरच झी २४ तास वाहिनीवर प्रसारित करण्यात येणार आहे.