२०२६ पासून ब्रिटनमध्ये यशराज फिल्म्सच्या तीन मोठ्या चित्रपटांचे चित्रीकरण होणार, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा!
भारताची आघाडीची चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी यशराज फिल्म्स (YRF) ने जाहीर केले आहे की ते २०२६ पासून आपले तीन प्रमुख चित्रपट युनायटेड किंगडममध्ये (UK) चित्रित करणार आहे. या निर्णयामुळे 3,000 हून अधिक रोजगारनिर्मिती होईल आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला कोट्यवधी पौंडांचा फायदा होणार आहे, अशी घोषणा ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आज मुंबईत केली.
या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी यशराज स्टुडिओ, मुंबई येथे भेट दिली, त्यांच्या सोबत ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट, ब्रिटिश फिल्म कमिशन, पाइनवुड स्टुडिओ, एल्स्ट्री स्टुडिओ आणि सिविक स्टुडिओ यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. योगायोगाने यशराज स्टुडिओला या वर्षी भारतामध्ये 20 वर्षे पूर्ण होत आहेत (12 ऑक्टोबर).
पंतप्रधान स्टार्मर यांचा हा दोन दिवसांचा दौरा भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यासाठी आहे.
ब्रिटनचा चित्रपट उद्योग दरवर्षी 12 अब्ज पौंडांचे योगदान देतो आणि 90,000 नोकऱ्या निर्माण करतो. भारत हा जगातील सर्वात मोठा चित्रपट निर्मिती करणारा देश आहे. यशराज फिल्म्स चा हा यूकेमधील पुनरागमन प्रकल्प भारत-ब्रिटन व्यापार कराराच्या सकारात्मक परिणामांचे प्रतीक मानला जात आहे.
कीर स्टार्मर म्हणाले —“बॉलिवूड परत ब्रिटनमध्ये आले आहे, आणि त्याच्यासोबत येत आहेत रोजगार, गुंतवणूक आणि नवे अवसर. हा करार भारत-ब्रिटन व्यापार संबंधांचा सर्वोत्तम नमुना आहे — जो विकासाला चालना देतो आणि दोन्ही देशांच्या सांस्कृतिक नात्यांना बळकट करतो.”
यशराज फिल्म्स चे सीईओ अक्षय विधानी म्हणाले —“यूके आमच्यासाठी सदैव खास राहिले आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (DDLJ) सारखे आमचे अनेक क्लासिक चित्रपट इथेच चित्रित झाले. पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे आमच्या स्टुडिओत स्वागत करणे आणि हा ऐतिहासिक करार साक्षीने पाहणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. आम्ही भारत आणि ब्रिटनच्या सहकार्याने जागतिक कंटेंट निर्मितीला नवीन दिशा देऊ इच्छितो.”
“डीडीएलजे च्या 30व्या वर्षात यूकेमध्ये पुन्हा परतणे हे खूपच भावनिक आहे. आम्ही सध्या त्याच चित्रपटाचे इंग्रजी म्युझिकल रूपांतर कम फॉल इन लव (CFIL) यूकेमध्ये सादर करत आहोत. यूकेचे इन्फ्रास्ट्रक्चर, तंत्रज्ञान आणि टॅलेंट अप्रतिम आहे.”
यूके'च्या सांस्कृतिक सचिव लिसा नंदी म्हणाल्या , “भारत आणि ब्रिटनचे चित्रपट उद्योग खरोखरच जागतिक दर्जाचे आहेत. दोन्ही देशांच्या गाढ सांस्कृतिक नात्यामुळे बॉलिवूड आणि ब्रिटिश स्टुडिओंचे सहकार्य नैसर्गिकच आहे. या चित्रपटांचे चित्रीकरण ब्रिटनमध्ये झाल्याने आमच्या सर्जनशील क्षेत्राला आणखी बळ मिळेल.”
या निर्णयामुळे भारत-ब्रिटन सांस्कृतिक सहकार्याला नवीन उभारी मिळेल आणि दोन्ही देशांमध्ये नवीन रोजगार, गुंतवणूक आणि प्रतिभा विनिमयाचे अवसर निर्माण होतील.
याशिवाय, ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूट आणि नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NFDC) यांच्यात सहकार्य करार (MoU) होणार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांचे निर्माते आणि कलाकार संसाधने आणि कौशल्य शेअर करू शकतील.
पूर्वी भारत-यूके सहकार्याने बनलेल्या स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटाने फक्त £12 मिलियन च्या बजेटवर £300 मिलियन ची कमाई केली होती — हे सिद्ध करत की ब्रिटिश तांत्रिक कौशल्य आणि भारतीय कथा सांगण्याची कला एकत्र आल्यास जगभरात चमत्कार घडू शकतो.