Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 : 19 ते 22 मार्चदरम्यान नवी दिल्लीत आयोजन

 भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 : 19 ते 22 मार्चदरम्यान नवी दिल्लीत आयोजन

ऊर्जा क्षेत्रासाठी टिकाऊ व सक्षम भविष्य घडवण्यासाठी प्रमुख भागधारक एकत्र – केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल


मुंबई / नवी दिल्ली, दि. 15 जानेवारी 2026: वीज आणि विद्युत क्षेत्रासाठीची आंतरराष्ट्रीय परिषद-सह-प्रदर्शनी असलेली भारत इलेक्ट्रिसिटी समिट 2026 ही 19 ते 22 मार्च 2026 या कालावधीत यशोभूमि, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील औपचारिक घोषणा केंद्रीय विद्युत तसेच गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री श्री. मनोहर लाल यांनी आज नवी दिल्लीत केली. यावेळी त्यांनी समिटचे ब्रोशर आणि टीझर फिल्मचे अनावरणही केले.



चार दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेची संकल्पना ‘विद्युतीकरणाचा विस्तार, शाश्वततेचे सक्षमीकरण आणि जागतिक जोडणी’ अशी आहे. भारताच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जागतिक ऊर्जा संक्रमणातील आव्हाने व संधी यांवर या समिटमध्ये सखोल चर्चा होणार आहे.


सरकार, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि नागरी समाजातील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय भागधारकांना एकत्र आणत वीज व शाश्वत ऊर्जा व्यवस्थेच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन केले जाणार आहे. विविध क्षेत्रांतील संवादाला चालना देणे, धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे आणि जागतिक सहकार्य वाढवणे, हा या समिटचा उद्देश आहे.


या समिटमध्ये 50 हून अधिक उच्चस्तरीय परिषद सत्रे, तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली पॅनेल चर्चा, थीमॅटिक पॅव्हेलियन तसेच वीज आणि स्वच्छ ऊर्जा मूल्यसाखळीतील आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन होणार आहे. सुमारे 500 हून अधिक प्रदर्शक, 25 हजारांपेक्षा अधिक उपस्थित, तसेच भारत व परदेशातील 1,000 प्रतिनिधी आणि 300 वक्ते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


या प्रसंगी वीज मंत्रालयाचे सचिव श्री. पंकज अग्रवाल, तसेच वीज मंत्रालय, केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA), केंद्रीय वीज नियामक आयोग (CERC), नवीन व नूतनीकरणीय ऊर्जा मंत्रालय, तेल व नैसर्गिक वायू मंत्रालय, कोळसा मंत्रालय, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांच्या दूतावासांचे प्रतिनिधी, राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे निवासी आयुक्त आणि सीआयआय CII, फिक्की FICCI, अॅसॉचॅम  ASSOCHAM या उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


तसेच जेनकॉस GENCOS, ट्रान्सकोस TRANSCOS आणि DISCOMS मधील वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.