कथा, चित्रपट आणि जागतिक अभिव्यक्तींचा सोहळा : भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 साठी माध्यम प्रतिनिधींना गोव्यात निमंत्रण, माध्यम प्रतिनिधींच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात
विशेष संवाददाता ---- दिलीप रामचंद्र यादव
______________________
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात इफ्फीचे (International Film Festival of IndiaI - FFI) पुन्हा एकदा गोव्यातील पणजी इथे पुनरागमन होणार आहे. यंदा या महोत्सवाdच्या 57व्या पर्वाचे पणजी इथेच 20 ते 28 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजन होणार असून, या निमित्ताने सिनेमांचे जग पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार आहे. भारत आणि जगभरातील चित्रपटकर्मी, चित्रपट क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ, पत्रकार आणि चित्रपटप्रेमींना एकत्र आणणाऱ्या यंदाच्या इफ्फीतून, कथात्मक मांडणीची जादू, चित्रपट अभिव्यक्तीमधील वैविध्यता आणि विविध संस्कृतींमधील प्रेक्षकांना परस्परांशी जोडणाऱ्या सर्जनशील भावनेचा सोहळाच साजरा होणार आहे.
या महोत्सवाअंतर्गत चित्रपटांचे खेळ, चर्चासत्रे, चित्रपटकर्मींशी संवाद आणि परस्परांसोबतचा आपला संपर्क विस्तारण्याची संधी अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कथा आणि दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर मांडला जाणार आहे. या सगळ्यातून कल्पना, संवाद आणि सहकार्यासाठीचे एक बहुआयामी व्यासपीठच उपलब्ध होणार आहे. या भव्य स्वरुपाच्या चित्रपट सोहळ्याच्या आयोजनासाठी गोवा सज्ज होत आहे, अशावेळी जागतिक चित्रपट समुदायासाठी सर्जनशील देवाणघेवाण आणि अर्थपूर्ण सहभागाची संधी उपलब्ध असावी याकरता इफ्फीच्या माधअयमातून अनोखे अवकाश उपलब्ध करून दिले जाणार आहे.
दरवर्षी इफ्फीचा विस्तार आणि या सोहळ्याचे दृश्यात्मक अस्तित्व विस्तारण्यात माध्यम प्रतिनिधी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. बातम्या, मुलाखती, परीक्षणे, विशेष लेख आणि डिजिटल वार्तांकनाच्या माध्यमातून माध्यमे या महोत्सवातील चित्रपट, कार्यक्रम आणि चर्चा भारतभरातील तसेच जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात मदत करत असतात. यातून वैविध्यपूर्ण कलाकार आणि त्यांच्या कलेची गौरवपूर्ण दखल घेण्यात मदत होत असते. इफ्फीमध्ये माध्यमांच्या सातत्यपूर्ण सहभागाला विशेष महत्त्व दिले जाते, कारण त्यामुळेच इफ्फीबद्दल तसेच सर्जनशील अभिव्यक्तीबद्दल व्यापक जागरूकता निर्माण होण्यास, तसेच या प्रक्रियेत लोकसहभाग वाढण्यास मोठी मदत होत असते.
माध्यम प्रतिनिधींसाठीची नोंदणी प्रक्रिया 1 ऑक्टोबरपासून सुरू
57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे म्हणजेच इफ्फी 2026 चे वृत्तसंकलन करण्याचे नियोजन करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना पत्र सूचना कार्यालयाच्या (पीआयबी) https://accreditation.pib.gov.in/eventregistration/login.aspx या अधिकृत नोंदणी पोर्टलवर माध्यम प्रतिनिधी (Media Delegate) म्हणून नोंदणी करता येईल.
माध्यम प्रतिनिधींसाठी नोंदणीची प्रक्रिया आज, 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2026 असणार आहे.

