*ओडिशाचे माननीय मुख्यमंत्री श्री. मोहन चरन माझी यांच्या हस्ते नेस्ले इंडियाच्या राज्यातील आगामी फॅक्टरीचे भूमिपूजन संपन्न*
~ ओडिशा येथील खोरधा फॅक्टरी ही नेस्ले इंडियाची पूर्व भारतातील पहिली फॅक्टरी ~
ओडिशाचे मुख्यमंत्री श्री. मोहन चरन माझी यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये पार पडलेल्या एका सोहळ्यामध्ये नेस्ले इंडियाने खोरधा, ओडिशा येथील आपल्या आगामी फॅक्टरीचा भूमिपूजन सोहळा पार पाडला. ही नेस्ले इंडियाची दहावी तर देशाच्या पूर्व भागातील पहिली फॅक्टरी असणार आहे.
खोरधा जिल्ह्यामध्ये एक अद्ययावत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे केंद्र स्थापन करण्याच्या कामी नेस्ले इंडियाने केलेल्या प्रगतीचा आपल्याला अभिमान असल्याचे ओडिशाचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री. मोहन चरन माझी यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. या फॅक्टरीमुळे नेस्ले इंडिया यशाची नवी शिखरे गाठण्यास सज्ज बनू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि त्यांच्या या प्रयत्नांना सातत्याने पाठबळ पुरवित राहण्याची हमी दिली.
नेस्ले इंडियाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सुरेश नारायणन म्हणाले, “”मेक इन इंडिया’च्या तत्त्वाचे दृढतेने पालन करत आम्ही ओडिशामध्ये आमच्या दहाव्या फॅक्टरीची घोषणा केली आहे व एक बाजारपेठ म्हणून भारताचे महत्त्व पुन:प्रस्थापित केले आहे. आमच्या योजना आणि प्रयत्नांना यश येताना पाहणे माझ्यासाठी अतीव आनंदाची बाब आहे. ही आगामी फॅक्टरी केवळ आमच्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल इतकेच नाही तर लैंगिक बहुविधता जपणाऱ्या, उत्पादनाच्या शाश्वत पद्धती वापरणाऱ्या, कागदविरहित, डिजिटल पद्धतीने व्यवस्थापित व पर्यावरणावर लक्ष केंद्रित करण्याशी बांधिलकी जपणाऱ्या उत्पादनकेंद्राचे एक उत्साहपूर्ण उदाहरण म्हणूनही ते उत्तुंग उभे राहणार आहे.”
ही फॅक्टरी पहिल्या टप्प्यात सुमारे ९०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक गुंतवणूकीसह उभारली जात आहे व इथे कंपनीच्या फूड्स (तयार पदार्थ आणि पाककृतींसाठी पूरक पदार्थ) पोर्टफोलिओतील उत्पादनांच्या निर्मितीची योजना आहे.
नेस्ले इंडियाने १९६१ साली मोगा (पंजाब) येथे आपले पहिले उत्पादन केंद्र स्थापन केले, त्यापाठोपाठ १९६७ साली चोलादी (तमिळनाडू); १९८९ साली नानजनगड (कर्नाटक); १९९२ मध्ये सामल्खा (हरयाणा); १९९५ आणि १९९७ मध्ये अनुक्रमे पोंडा आणि बिचोलिम (गोवा), २००६ साली पंतनगर (उत्तराखंड); २०१२ मध्ये ताहलीवाल (हिमाचल प्रदेश) येथे कंपनीची उत्पादन केंद्रे उभारली गेली. नेस्ले इंडियाने २०२१ मध्ये सानंद (गुजरात) येथे नववे उत्पादन केंद्र सुरू केले.